ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उमरी पोतदारचे आरोग्य मंदिर म्हणजे लोकसहभाग, सेवाभाव आणि आधुनिक सुविधांचा संगम _ आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

उमरी पोतदार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र संकुलासाठी ८ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये आणि स्मार्ट आरोग्य केंद्रासाठी १ कोटी ३२ लाख ७७ हजार ४९० इतका रुपयांचा निधी मंजूर करून आरोग्य मंदिर उभारलेले आहे. हे आरोग्य मंदिर म्हणजे लोकसहभाग, सेवाभाव आणि आधुनिक सुविधांचा संगम आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी लोकार्पण सोहळ्यात केले.

उमरी पोतदार येथील प्राथमिक आरोग्य मंदिराच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे,डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, संध्याताई गुरनूले, अलकाताई आत्राम, हरीश ढवस, सरपंच ठामेश्वरी लेनगुरे, नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे, राहुल संतोषवार, ज्योतीताई बुरांडे, विनोद देशमुख,तहसीलदार मोहनिश सेलवटकर, कार्यकारी अभियंता (जि.प.) श्री. बाराहाते, संवर्ग विकास अधिकारी नमिता बांगर, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामीडवार आदींची उपस्थिती होती.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, कळमना, मानोरा व पोंभुर्णा आता उमरी पोतदार आरोग्य सेवेच्या प्रवासातील नवा आणि प्रेरणादायी टप्पा ठरला आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री असताना महाराष्ट्रातील सर्वाधिक निधी चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिला. आरोग्य क्षेत्रात आपला जिल्हा नेहमीच पुढे राहावा असा माझा प्रयत्न आहे.’

ग्रामस्थांच्या एकोप्याने आणि श्री. लक्ष्मण सायलू सल्लम व श्री. सोयाजी नामेवार यांच्या भूमिदानाने उमरी पोतदार आरोग्य मंदिराला खऱ्या अर्थाने सामाजिक पाया मिळाला आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून उत्तम आरोग्य राखावे, असे आवाहन यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केले.

या आरोग्य केंद्रात अत्याधुनिक यंत्रसामग्री, सर्व आवश्यक सोयी सुविधा तसेच भविष्यात आजार उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करण्यात आली आहे. गर्भवती महिलांसाठी उत्कृष्ट सोयीसुविधांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत विनोद देशमुख यांनी “निक्षय मित्र” म्हणून तालुक्यातील 43 क्षयरुग्णांना दत्तक घेतले. मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते या रुग्णांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले.

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हेलिपॅडची सुविधा

महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलिकॉप्टर ॲम्बुलन्ससाठी हेलिपॅडची व्यवस्था नाही. मात्र, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यातील एकमेव महाविद्यालय आहे, जिथे हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, 140 खाटांचे कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हेलियम न वापरणारी देशातील पहिली एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात कॅन्सर तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात येत आहेत.

विशेष मान्यता घेऊन मानोरा पीएचसी

महिलांसाठी ‘पिंक ओपीडी’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र निकष आणि आकृतीबंधात बसत नसल्याने, मंत्रिमंडळाची विशेष मान्यता घेऊन मानोरा पीएचसी पूर्ण करण्यात आली. आज कळमना, मानोरा, उमरी पोतदार आणि पोंभूर्णा इतक्या कमी अंतरावर आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे इतरांनी या जिल्ह्याचा हेवा करावा अशा आरोग्य सुविधा येथे निर्माण करण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी दिली ध्यानमंदिराला भेट

श्रीशैलम येथे ध्यानमंदिर उभारण्याचे कार्य मी अर्थमंत्री असताना केले. विश्वगौरव मा.नरेंद्रजी मोदी यांनी श्रीशैलम येथील ध्यानमंदिराला अलीकडेच भेट घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्यानमंदिर उभारण्याचे कार्य माझ्या हातून झाले याचा मला अभिमान वाटतो. अयोध्येतील राममंदिर, संसदेच्या इमारतीतील प्रत्येक दरवाजा आणि माननीय पंतप्रधान महोदयांची खुर्ची ही बल्लारपूरच्या लाकडापासून तयार करण्यात आली आहे, याचाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये