बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्लीच्या अल्पमुदत प्रशिक्षणांना नागपूर विद्यापीठाची मान्यता

चांदा ब्लास्ट
बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली (BRTC) या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या “बांबू हस्तकला” आणि “बांबू फर्निचर” या अल्पमुदत व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.
या मान्यतेमुळे संस्थेचे प्रशिक्षण आता विद्यापीठीय ओळख प्राप्त होऊन प्रशिक्षणार्थींना नागपूर विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हे प्रशिक्षण चार क्रेडिटचे असून, उमेदवारांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही ते उपयुक्त ठरणार आहे. या प्रमाणपत्रामुळे प्रशिक्षणार्थींना पुढे डिप्लोमा, पदवी किंवा उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणे सुलभ होईल.
या मान्यतेसाठी बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राने नागपूर विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण व विस्तार विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने चिचपल्ली येथे भेट देऊन संस्थेची पायाभूत सुविधा, प्रशिक्षण पद्धती, तांत्रिक मनुष्यबळ व कार्यक्षमतेचे मूल्यमापन केले. समितीने संस्थेला हे प्रशिक्षण प्रभावीपणे राबविण्यास सक्षम असल्याचे मत नोंदविल्यानंतर विद्यापीठाने ही मान्यता प्रदान केली.
या उपक्रमामागे प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन व वन्यजीव) तसेच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) एम. एस. रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निर्देशानुसार संस्थेने आवश्यक कार्यवाही करून ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.
संस्थेचे संचालक मनोज खैरनार यांच्या नेतृत्वाखालील टीमने सातत्यपूर्ण प्रयत्न, नियोजन आणि दूरदृष्टी दाखवून हे यश संपादन केले आहे. त्यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या बांबू औद्योगिक धोरणामुळे बांबू क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर विद्यापीठ मान्यताप्राप्त प्रमाणपत्रामुळे प्रशिक्षणार्थींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्हता मिळून शासकीय योजना, शिष्यवृत्ती व रोजगार संधींचे दरवाजे खुलणार आहेत.
या मान्यतेमुळे बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली हे राज्यातील कौशल्याधारित शिक्षण व उद्योगसंबंधित प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अधिक सक्षमपणे उभे राहणार आहे.