दिवाळी बोनससाठी बरांज खुल्या कोळसा खाणीतील कामगारांचे आंदोलन
खाण बंद, संतप्त कामगार रस्त्यावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
बरांज खुल्या कोळसा खाणीतील कामगारांना अद्यापही दिवाळी बोनस मिळाला नसल्याने आज संतप्त कामगारांनी मोठ्या संख्येने खाणीचे काम बंद पाडत आंदोलन छेडले. यामुळे बरांज खुली कोळसा खान पूर्णपणे ठप्प झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बि.एम.पी.एल. कंपनीकडून चालविण्यात येणाऱ्या या खाणीतील कामगारांना नियमानुसार वेतनाबरोबर वार्षिक दिवाळी बोनस देणे बंधनकारक आहे. कंपनीने दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी बोनसबाबत “रिसर पत्र” काढून कामगारांना लवकरच बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली असतानाही कामगारांच्या खात्यात बोनस जमा झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर उलगुलान खान कामगार संघटनेच्या वतीने आज गुरुवारी (दि. १६ ऑक्टोबर) संतप्त कामगारांनी अचानक खाणीचे संपूर्ण काम बंद केले. सकाळपासूनच कामगारांनी प्रवेशद्वारावर घोषणाबाजी सुरू केली. “बोनस द्या – नाहीतर खान बंद करा!” अशा घोषणा देत कामगारांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
या घडामोडीची माहिती मिळताच कंपनी व्यवस्थापनाने भद्रावती पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांना हटविण्याचा प्रयत्न केला, मात्र कामगारांनी ठाम भूमिका घेतली. अखेर कामगारांनी केपीसीएल कार्यालयाकडे मोर्चा वळवत भहावती येथील “केपीसीएल कार्यालया” समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे बरांज परिसरात वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
संघटनेचे नेते अरविंद देवगडे, पांडुरंग सातपुते, सुभाष गेडाम, विनोद आगलावे, महेश पेटकर, शंकर बाडपणे, मारुती खंडाळकर, रवींद्र निखाडे, महेंद्र नवघरे आदींसह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
कामगारांचे म्हणणे आहे की —
“कंपनीकडे पैसा नसल्याचे सांगून दिवाळीनंतर बोनस देण्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहे. वर्षभर मेहनत करणाऱ्या कामगारांच्या हक्काचा बोनस दिवाळीच्या आधी मिळायलाच हवा.
दरम्यान, खाणीतील उत्पादन ठप्प झाल्याने कंपनी प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, उलगुलान खान कामगार संघटनेने मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.