आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतले साई पादुकांचे दर्शन
आवो साई पालखी सेवा समितीच्या वतीने साई पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन.

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहरात श्री साई पादुका दर्शन सोहळ्याचा भव्य उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला. शहरात सकाळपासूनच ‘जय साईनाथ’चा गजर सुरू होता. या भक्तिमय वातावरणात सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शवून श्री साई पादुकांचे दर्शन घेत साईबाबांच्या चरणी चंद्रपूर जिल्ह्याच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
यावेळी आवो साई पालखी सेवा समितीचे अध्यक्ष रवी अल्लेवार, दाताळा देवस्थानचे संस्थापक राजू नागरकर, भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, युवती प्रमुख प्रियंका चिताडे, जितेंद्र इतगीरवार, नकुल वासमवार यांच्यासह आवो साई पालखी सेवा समिती आणि मंदिर समितीच्या विश्वस्तांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार जोरगेवार यांनी साईबाबांच्या पादुकांचे पूजन करत साईबाबांच्या शिकवणीत दडलेला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश अधोरेखित केला. त्यांनी सांगितले की, साईबाबांचे तत्त्वज्ञान हे श्रद्धा, सबुरी आणि मानवतेचे प्रतीक आहे. साईबाबांनी शिकवलेला प्रेम, एकता आणि सेवा यांचा मार्ग आजच्या समाजाला एकत्र ठेवणारा आहे. अशा सोहळ्यांमधून समाजात भक्ती, सौहार्द आणि सकारात्मकता वाढते.
आवो साई पालखी सेवा समिती, चंद्रपूर आणि दाताड देवस्थान यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला शहरातील हजारो साईभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी साई पादुकांची मिरवणूक निघाली. ढोल-ताशे, फुलांची उधळण, साईनाथ महाराज की जय च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. आमदार जोरगेवार यांनी या मिरवणुकीत सहभागी होत भक्तांशी संवाद साधला.
या सोहळ्यामुळे चंद्रपूर शहर भक्ती, प्रेम आणि ऐक्याच्या वातावरणाने उजळून निघाले होते. पादुकांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर फुलांची आरास करण्यात आली होती. हजारो भक्तांनी दर्शन घेत साईबाबांच्या कृपेचा लाभ घेतला. आमदार किशोर जोरगेवार यांनीही साईबाबांच्या चरणी पुन्हा नतमस्तक होत सर्व चंद्रपूरकरांच्या आरोग्य, प्रगती आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.