नगरसेवक असा असावा! आयुक्तांना बाईकवर बसवून वार्डाचा मारला फेरफटका
नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष दाखवल्या

चांदा ब्लास्ट
नगरसेवक हा केवळ कार्यालयात बसून तक्रारी ऐकणारा नसून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष पाहून त्यावर उपाययोजना करणारा असावा, याचे उत्तम उदाहरण नगरसेवक रॉबिन बिस्वास यांनी दाखवून दिले. रॉबिन बिस्वास यांनी चक्क महापालिकेच्या आयुक्तांना आपल्या बाईकवर बसवून वार्डातील विविध भागांचा फेरफटका मारत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष दाखवून दिल्या.
या पाहणीदरम्यान बंगाली कॅम्प मार्केट, शांतीनगर, परिवर्तन चौक, आझाद चौक, राजीव गांधी नगर आणि शंकर नगर या परिसरात जाऊन स्थानिक नागरिकांच्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, नाल्यांची दुरवस्था तसेच स्वच्छतेचा अभाव असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या.
नगरसेवक रॉबिन बिस्वास यांनी आयुक्तांचे लक्ष वेधत संबंधित भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करणे, नाल्यांची साफसफाई करणे आणि स्वच्छतेसाठी सफाई कर्मचार्यांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याची मागणी केली. नागरिकांना भेडसावणार्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देशही यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
नगरसेवकाने स्वतः पुढाकार घेत आयुक्तांना वार्डात फिरवून समस्या दाखवल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला प्रत्यक्ष मैदानात उतरविण्याची ही पद्धत “नगरसेवक असा असावा” असे म्हणण्यास भाग पाडणारी ठरली आहे.



