ब्लॅक स्पॉटवरील अपघातांना लगाम घाला
खा. धानोरकर आक्रमक; रस्ते सुरक्षा कामांमध्ये 'कन्वेक्स मिरर'चा समावेश करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : शहर महानगरपालिका (मनपा) क्षेत्रातील अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समितीचे सचिव यांच्याकडे आक्रमक भूमिका घेत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. विशेषतः ‘ब्लॅक स्पॉट’ आणि अंध वळणांवर दृश्यमानता वाढवण्यासाठी त्यांनी परावर्तक रोड स्टड्स सोबतच ‘कन्वेक्स मिरर’ तातडीने बसवण्याची मागणी केली आहे.
शहरवासीयांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रमुख कामांना तातडीने मंजुरी देऊन त्यांची अंमलबजावणी त्वरित सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
शहरातील मुख्य चौक, अरुंद वळण मार्ग आणि वारंवार अपघात होणाऱ्या ‘ब्लॅक स्पॉट’वर वाहनचालकांना बाजूने येणारे वाहन स्पष्टपणे दिसावे यासाठी तातडीने कन्वेक्स मिरर बसवावेत. हे आरसे ‘ब्लाइंड स्पॉट्स’वरील दृश्यमानता वाढवून संभाव्य मोठे अपघात टाळण्यास मदत करतील. याच ठिकाणी परावर्तक रोड स्टड्स बसवून रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेचा अंदाज स्पष्ट होईल, त्यासोबतच शहरातील मुख्य रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग व थांबा रेषा रात्रीच्या वेळी अतिशय स्पष्टपणे दिसाव्यात यासाठी थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर करून नवीन मार्किंग करावे. यामुळे वाहनचालकांना रहदारीच्या नियमांचे पालन करणे सोपे होईल.
चंद्रपूर शहर महानगर पालिका हद्दीतील सर्व प्रमुख दवाखाने आणि शाळांच्या परिसरामध्ये ‘शांतता क्षेत्र’ निश्चित करावे. या संवेदनशील भागांमध्ये वाहतूक नियमन सुधारण्यासाठी ‘शांतता क्षेत्र’ आणि ‘सावकाश चला ‘ दर्शवणारे स्पष्ट व परावर्तक सावधानता फलक तातडीने लावण्याचे निर्देशही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले आहेत.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सदर कामे रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून प्राधान्याने आणि तातडीने मंजूर करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.