पडोली-घुग्घुस मार्गावर मोकाट जनावरांचा त्रास वाढला
मनसेचा प्रशासनाला इशारा

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) : पडोली ते घुग्घुस या मार्गावर वाढत्या मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांमुळे वाहतूक विस्कळीत होत असून, अनेक वाहनचालकांचे अपघातही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी, घुग्घुस सीईओ तसेच पडोली व घुग्घुस पोलिस ठाण्याला निवेदन देण्यात आले.
मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पडोली-घुग्घुस मार्गावर मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाने या जनावरांसाठी योग्य ती व्यवस्था करावी, अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी त्यांचीच राहील. तसेच, पुढील दहा दिवसांत योग्य तो उपाय न झाल्यास मनसेकडून सर्व मोकाट जनावरे थेट घुग्घुस नगरपरिषदेत सोडण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या वेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष पंकज राजपूत, मनसे सैनिक सतीश गोहोकर, शिवसेना (उबाठा) घुग्घुस शहर संघटक अमित बोरकर, तसेच राजेश मोरपाका, श्रवण सोनटके, चेतन काकडे, सुमित सातपुते, प्रीतम गजबे, प्रेम गजबे आणि शुभम कामतवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.