खा. धानोरकर यांच्या ‘चक्काजाम’ आंदोलनाला यश
ओला दुष्काळ व विशेष मदत पॅकेज जाहीर; जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा समावेश

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर – अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नागपूर-चंद्रपूर महामार्गावर केलेल्या ‘चक्काजाम’ आंदोलनाला मोठे यश आले आहे. शेतकऱ्यांच्या तीव्र मागणीची आणि संतापाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तातडीने पाऊले उचलली असून, राज्यातील २५३ तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत. या बाधित भागांसाठी शासनाने विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू करण्यास मान्यता दिली आहे.
या आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेली “सातबारा कोरा” करण्याची घोषणा निव्वळ फसवी ठरल्याचा आरोप करत, सरकारने तातडीने ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी प्रमुख मागणी केली होती. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी, महसूल व वन विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, राजुरा, कोरपना, नागभीड, जिवती, गोंडपिंपरी, पोभुरना, आणि ब्रम्हपुरी या सर्व १४ तालुक्यांचा समावेश बाधित तालुक्यांच्या यादीत करण्यात आला आहे.
या विशेष पॅकेज अंतर्गत शेतीपिकांच्या नुकसानीसाठी भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. यात जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टर ८,५०० रुपये आश्वासित सिंचनाखालील (बागायत) पिकांसाठी १७,००० रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रुपये (सर्व मदत ३ हेक्टरच्या मर्यादेत) दिली जाणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांच्या मागण्यांनुसार रब्बी हंगामासाठी खते व बियाणे खरेदीकरिता कृषी विभागामार्फत प्रति हेक्टरी १०,००० रुपये (३ हेक्टरच्या मर्यादेत) थेट बँक खात्यात जमा केले जातील.
यासोबतच सरकारने अनेक महत्त्वाच्या सवलती लागू केल्या आहेत : सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, जमीन महसूलात सूट आणि तिमाही वीज बिलात माफी या प्रमुख सवलतींचा समावेश आहे. घर पडझड झालेल्यांना सपाट भागात १ लक्ष २०,००० रुपये पर्यंत आणि डोंगराळ भागात १ लक्ष ३०,००० रुपये पर्यंत मदत मिळेल. तसेच, मृत व्यक्तीच्या वारसांना ४ लक्ष आणि दुधाळ जनावरे मृत झाल्यास ३७ हजार ५०० रुपये प्रति जनावर मदत दिली जाईल. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखालील या एकवटलेल्या शक्तीमुळे सरकारला तातडीने हा ऐतिहासिक निर्णय घेणे भाग पडले असून, चंद्रपूरसह राज्यातील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हे विशेष पॅकेज खरीप हंगाम २०२५ (जून ते ऑक्टोबर) साठी लागू राहणार आहे.
‘मदती’च्या यादीतून मुख्यमंत्र्यांचा ‘मूल’ तालुकाच गायब
खा. धानोरकरांचा सरकारवर घणाघात: “हा स्वतःच्याच शेतकऱ्यांवर केलेला अन्याय”
चंद्रपूर – अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजच्या यादीतून थेट मुख्यमंत्र्यांचा मूळ तालुका असलेला ‘मूल’ वगळण्यात आला आहे. महसूल व वन विभागाने घोषित केलेल्या २५३ बाधित तालुक्यांच्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा समावेश आहे, परंतु अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेल्या ‘मूल’ तालुक्याचा समावेश जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे.
काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या पक्षपाती भूमिकेवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. “एकीकडे ‘चक्काजाम’ आंदोलनाच्या दबावामुळे सरकारला मदत जाहीर करावी लागली, पण दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा गृहतालुका असूनही ‘मूल’ला या यादीतून वगळणे हा तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांवर केलेला घोर अन्याय आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
‘मूल’ तालुक्याच्या शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित ठेवणे हा मोठा राजकीय पक्षपात असून, शासनाने तातडीने ‘मूल’ तालुक्याचा बाधित यादीत समावेश करून येथील शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्यास तयार राहणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.