ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसील कार्यालयात विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा ११ दिवसांनी मृत्यू

न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न केल्याने घटना : दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अखेर एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. मोरवा (ता. भद्रावती) येथील शेतकरी परमेश्वर ईश्वर मेश्राम (वय ५५) यांनी २६ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान तब्बल ११ दिवस जीवन-मरणाशी झुंज दिल्यानंतर सोमवारी (६ ऑक्टोबर) पहाटे ३ वाजता चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, दोषी तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

    [न्यायालयीन आदेशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष]

मेश्राम आणि त्यांच्या वारसांची नावे न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार गाव नमुना ७ मध्ये नोंदविली जाणे आवश्यक होते. मात्र, महसूल विभागाने “मालकी हक्काबाबत वाद आहे” असे कारण सांगत आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. दीर्घकाळ प्रकरण प्रलंबित ठेवल्याने मेश्राम मानसिक तणावाखाली गेले आणि शेवटी त्यांनी तहसील कार्यालयातच विष प्राशन करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. उपचारा दरम्यान मेश्रान यांचा मृत्यू झाला.

मृतक अर्जदार परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५, रा. मोरवा) यांनी कुरोडा येथील सर्वे नंबर 86, 87, 95, 98 मधील शेतजमिनीवर 2015 च्या न्यायालयीन आदेशानुसार वारसांची नावे अभिलेखात नोंदविण्याची मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी केली नाही. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतरही न्याय न मिळाल्याने निराश झालेल्या परमेश्वर मेश्राम यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात विषप्राशन केले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नीले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाने महसूल अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता नियम 1969 च्या उल्लंघनाबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे.

*तहसीलदार भांडारकर यांचा कार्यकाळ वादग्रस्त*

तहसीलदार भांडारकर यांच्या कार्यकाळात अनेक वाद निर्माण झाले. अवैध रेती व मुरूम उत्खनन प्रकरणे, कार्यालयात गैरहजेरी, शेतकऱ्यांच्या लोकअदालतीत अनुपस्थिती, तक्रारी प्रलंबित ठेवणे आणि ग्रामस्थांच्या समस्या न सोडविणे अशा अनेक आरोपांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. दरम्यान शेतकऱ्यांनी वरिष्ठाकडे अनेक तक्रारी दिल्या होत्या.

मात्र भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथील शेतीसंबंधी प्रकरणात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करता जाणीवपूर्वक कर्तव्यात कसुरी केल्यामुळे शेतकऱ्यांनी भद्रावती तहसील कार्यलयात विष प्राशन करून स्वतःचे जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणी तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी जारी केल्याने एकच खळबळ उडाली होती.

          आता मात्र शेतकऱ्याचा मृत्यू झाला असुन शासन दोषींवर काय कारवाई करेल याकडे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे, शेतकरी संघटनेचे व जनतेचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये