अजय मुसळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या भद्रावती तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा, चिरादेवी येथील विज्ञान व गणित विषयाचे शिक्षक अजय बाबुरावजी मुसळे यांना यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
अजय मुसळे हे मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील आहेत. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी घेतलेली उपक्रमशीलता आणि सामाजिक जाणिवा वाढविण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नक्षल संवेदनशील भागात १० वर्षे सेवा देत त्यांनी शिक्षणाचा दिवा प्रज्वलित ठेवला. ११ कोटी रुपयांच्या बांधकामासह मॉडेल स्कूलच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप व NMMS स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले असून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्येही शाळेचे यश लक्षणीय ठरले आहे.
शिक्षण सेवेसोबतच ते पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्यातही सक्रियपणे सहभागी असतात. त्यांच्या या कामगिरीबद्दल गावकरी, विद्यार्थी व पालकवर्गात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.