शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत भद्रावतीतील नागरिकाची ११ लाखाने फसवणुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील गुरूनगर येथील किशोर खेडीकर (वय ४७) यांची ऑनलाईन फसवणुकीत तब्बल १० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. किशोर हे पुण्यातील एका कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करतात. ३१ जुलै २०२५ रोजी ते इन्स्टाग्रामवर स्क्रोल करत असताना त्यांना शेअर मार्केटसंबंधी एक जाहिरात दिसली. मोठा नफा मिळेल या आशेने त्यांनी त्या जाहिरातीवर प्रतिसाद दिला.
यानंतर त्यांना “नुवामा ट्रेडींग ग्रुप” नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. त्या ग्रुपमध्ये शेअर मार्केट गुंतवणुकीबाबत विविध माहिती, टिप्स आणि आकडेवारी शेअर केली जात होती. या माहितीने प्रभावित होऊन किशोर यांनी गुंतवणुकीची सुरुवात केली. त्यांना “नुवा प्रो” नावाचे एक अॅप डाउनलोड करून त्यावरून आयपीओ खरेदीद्वारे गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. त्यांनी नेटबँकिंगद्वारे थोड्या थोड्या रकमेने एकूण १० लाख ७५ हजार रुपये गुंतवले.
किशोर यांनी नफा मिळाल्यानंतर पैसे परत काढण्याचा प्रयत्न केला असता, संबंधितांनी विविध कारणे देत “तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे” असे सांगून पैसे विड्रॉल होऊ दिले नाहीत. अनेकदा प्रयत्न करूनही पैसे परत मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांना फसवणुकीचा संशय आला.
यानंतर त्यांनी २८ ऑगस्ट २०२५ रोजी नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल केली. अखेर शुक्रवारी त्यांनी भद्रावती पोलिस स्टेशनला भेट देऊन औपचारिक तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत कलम ६६ (ड) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
नागरिकांनी मोबाईलवर कोणत्याही अनोळखी लिंकला प्रतिसाद देवू नये. तसेच कोणतेही अॅप डाऊनलोड करू नये. याबाबत सरकारकडून नेहमीच जनजागृती करण्यात येत असते. मात्र अशी घटना घडल्यास लगेच पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर आहोत.
– योगेश्वर पारधी, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन भद्रावती.