देऊळगाव राजा मध्ये रंगला बालाजींचा पालखी सोहळा
भाविकांनी श्रींच्या मूर्तीला स्पर्श करुन घेतले दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्रातील लाखो भाविकांसाठी तिरुपतीचे प्रतिरूप असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात असंख्य भक्तांची मांदियाळी पाहावयास मिळाली. मध्यरात्रीनंतर पालखीत विराजमान झालेले श्री बालाजी सीमोल्लंघनासाठी निघाले व सुमारे २० तास ५२ थांब्यांवर श्रींच्या मूर्तीला स्पर्श करीत लाखो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
३३३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या सोहळ्यात श्रींची मूर्ती विराजमान झालेली पालखी मध्यरात्रीनंतर लक्ष्मी रमण गोविंदा व श्री बालाजी महाराज की जय या जयघोषामध्ये मंदिराबाहेर निघाली. तत्पूर्वी पुजारीवृंद व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत, श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी कुटुंबासह श्रींची महाआरती केली.
घटउत्थापन, यजमानांचा व मानाचा अभिषेक, वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांचा प्रथेनुसार पुजारी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार, शस्त्र पूजन, आशीर्वाद विधी असे सर्व विधी करण्यात आले.
नगरपरिषदेने सुशोभीकरण केलेल्या नदीमधील पालखी बैठकीच्या ठिकाणी संस्थानतर्फे भाविकांसाठी दर्शन व्यवस्था करण्यात आली. या पालखी मिरवणूकीमध्ये २५ दिंड्या, जालना येथील लेझीम, काठ्या व दांडिया पथक, बँड पथक, श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे ढोल व टाळ पथक, तसेच इतरही दांडिया व ढोल पथक सहभागी झाले. शहरातील दानशूर अन्नदात्यांकडून पालखीसोबतच्या पथकांना ठिकठिकाणी अन्नदान करण्यात आले.
पट्टेधारी खांदेकर्यांनी ड्रेस कोड तयार करून तसेच श्री बालाजी महाराज संस्थान, देऊळगाव राजा या नावाचे आकर्षक पट्टे तयार करून पालखीचे शिस्तीत मार्गक्रमण करून सर्व भक्तांचे सुरळीतपणे दर्शन घडवून आणले. हा पालखी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व ब्राह्मणवृंद, पट्टेधारी, सर्व समाज सेवेकरी, मानकरी, श्री बालाजी संस्थान, पोलीस प्रशासन, श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे एनसीसी व एनएसएस पथक यांच्यासह भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.