सर्वसामान्यांच्या हितासाठी सतत कार्यरत राहणे हाच माझा संकल्प – आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार
सुधीरभाऊंच्या कार्याचा हेवा वाटतो; त्यांच्यासारखा नेता लाभणे भाग्याची गोष्ट - सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी

चांदा ब्लास्ट
प्राजक्ता माळींच्या बेंबाळ येथील स्वागतासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी
बेंबाळ येथे भव्य मां अंबिका जागरण कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर :- राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, नारीशक्ती, तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निस्वार्थपणे कार्य करणार असल्याचा निर्धार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. बेंबाळ व नवेगाव येथील रस्त्यांच्या दर्जेदार कामासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचेही त्यांनी आश्वस्त केले.
शारदा उत्सव समिती, बेंबाळतर्फे विवेकानंद विद्यालय, बेंबाळ येथे आयोजित भव्य माँ अंबिका जागरण कार्यक्रमात आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.कार्यक्रमाला ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची प्रमुख उपस्थितीती विशेष आकर्षण ठरली. यावेळी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, प्रवीण मोहूर्ले, चंदू मारगोनवार, संजय येनुरकर, वंदनाताई अगरकाटे, किशोर कापगते, दिलीप पाल, ईश्वर कोरडे, मुन्ना कोटगले, मंगेश मगनूरवार, अविनाश जगताप, तालुका व ग्रामीण पदाधिकारी कार्यकर्ते
तसेच शारदा उत्सव समिती अंतर्गत येणाऱ्या बेंबाळ, जुनासुर्ला क्षेत्रातील महिला मंडळातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एक सेवक म्हणून निस्वार्थपणे कार्य करेल. येथील नागरिकांच्या सेवेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नेहमी तत्पर आहेत. नवरात्राचा हा उत्सव समाजाला एकत्र बांधणारा असून “हम साथ साथ हैं” हा भाव निर्माण करणारा आहे. एकमेकांशी प्रेमाने वागा, आणि “प्रेम की गंगा बहाते चलो” हा विचार मनाशी धरून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी निस्वार्थपणे कार्य करा. चेहऱ्यावरचे हास्य हेच खरे सौंदर्य असून ते वर्षातील ३६५ दिवस तुमच्यासोबत कायम राहावे.’ नवरात्रीच्या पावन पर्वावर जिल्ह्याची आराध्यदेवता माता महाकालीची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहील, असेही ते म्हणाले.
अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या, भारत मातेचा जयघोष ऐकून हर्ष वाटला. याचे संपूर्ण श्रेय सर्वांवर संस्कार करणाऱ्या सुधीरभाऊंना जाते. सुधीरभाऊ सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत ठामपणे आवाज उठवतात, लहान माणसांची मने जपतात आणि जे बोलतात ते करून दाखवतात. बेंबाळवासियांचे भाग्य की त्यांना संस्कार करणारा नेता लाभला. मला या गोष्टीचा हेवा वाटतो. या मतदारसंघात सर्व सोयी-सुविधा उभारून सुधीरभाऊंनी विकास साधला आहे. भाऊंच्या गरब्याच्या निमित्ताने मला पहिल्यांदा या ठिकाणी येण्याची संधी मिळाली, याचा मला मनस्वी आनंद आहे.