“बाळूभाऊंची प्रेरणा आणि चंद्रपूरकरांचे अलोट प्रेम; याच बळावर ‘भाऊचा दांडिया’चे चौथे पर्व यशस्वी : खा. धानोरकर
११ दिवसांच्या उत्सवात चंद्रपूर थिरकले; विजेत्यांवर दुचाकीसह रोख बक्षिसांचा वर्षाव

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर – “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रेरणा आणि चंद्रपूरकरांचे प्रेम यांमुळेच हा महोत्सव दरवर्षी अधिक उत्साहाने पार पडतो,” अशा भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-भाऊचा दांडिया’ या सोहळ्याचे चौथे वर्ष दिनांक २ ऑक्टोबर रोजी थाटामाटात संपन्न झाले. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीला वंदन करत सलग अकरा दिवस (२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) चांदा क्लब मैदानावर दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी गुणवंत कलाकारांना दुचाकीसह लाखो रुपयांच्या रोख पुरस्कारांचे वितरण करून त्यांच्या कलागुणांना सन्मानित करण्यात आले.
हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम केवळ दांडियाचा मनमुराद आनंद देणारा नव्हता, तर शिक्षण, क्रीडा, कला, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत मान्यवरांचा गौरव करण्याचा एक महत्त्वाचा मंच ठरला.
समारोपावेळी दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते चॅम्पियन पुरुष गटातून अनुराग घोरपडे आणि चॅम्पियन महिला गटातून मनीषा सरकार यांनी दुचाकी आणि सन्मानचिन्ह पटकावले. याशिवाय, किंग मध्ये धनंजय मेश्राम आणि क्वीन मध्ये सुष्मिता मलिक यांनी पारितोषिक मिळवले.
यावेळी रील स्पर्धा, ग्रुप दांडिया, लहान गट आणि ३५ वर्षांवरील महिला गटातील स्पर्धकांनाही रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले. मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने आयोजित या महोत्सवामुळे चंद्रपूरकरांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची आणि दांडिया खेळण्याची उत्तम संधी मिळाली. या यशस्वी आयोजनाबद्दल स्पर्धकांनी व नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह शहरातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.