कोरपना तालुका काँग्रेस कमिटीकडून तहसीलदारांना निवेदन सादर
शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
कोरपना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तहसीलदार, कोरपना यांना एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात गेल्या तीन महिन्यांपासून सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले मोठ्या प्रमाणातील नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, यावर्षी सततच्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापसाच्या झाडांना लागलेली बोंडे पूर्णपणे खराब झाली असून, सध्या कापसाच्या झाडांना फळेच लागलेली नाहीत. त्याचप्रमाणे, सोयाबीन पिकाला शेंगा न भरल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत शासनाने तात्काळ सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.
निवेदन सादर करताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. उत्तम पेचे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये श्याम रणदिवे (माजी सभापती), भाऊराव पा. चव्हाण (उपाध्यक्ष, खरेदी-विक्री), प्रशांत लोडे (अध्यक्ष, शहर काँग्रेस कोरपना), रमेश मेश्राम (सरपंच), शगीर भाई (उपसरपंच), यादव दरने (माजी उपसरपंच), सुरेश पा. मालेकर, सचिन मालेकर, राहुल मालेकर (अध्यक्ष, ओबीसी), अनिल गोंडे (माजी उपसरपंच), मोतीराम पा. सोयाम, विलास आडे (माजी सरपंच), शंकर पा. पेचे (माजी सरपंच), मिलिंद ताकसांडे (सदस्य, ग्राम पंचायत), सुनील कोहचाडे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
या निवेदनाद्वारे तालुका काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडली असून, शासनाकडून तात्काळ आणि प्रभावी पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीला प्रशासन कशा प्रकारे प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.