ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : घुग्घुस येथील पंचशील बौद्ध विहारात ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नगर परिषद येथे प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व सामूहिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. त्यानंतर पंचशील बौद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक शेडके, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव वनकर उपस्थित होते. तथागत बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धम्मध्वजारोहण करण्यात आले.

मार्गदर्शन करताना सुरेश मल्हारी पाईकराव यांनी बौद्ध बांधवांना मृत्यू प्रसंगी अंधश्रद्धांना बळी न पडता १४ नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तर माधव वनकर यांच्या मुलगा कल्पित वनकर याला बॅंकेत नोकरी मिळाल्याबद्दल कुटुंबीयांनी कोणताही उत्सव न करता थेट नवनिर्मित विहार बांधकामासाठी दहा हजार रुपये दान दिले. हे दान अध्यक्ष पाईकराव, कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे व चंद्रगुप्त घागरगुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलींनी भीमगीतांवर नृत्य सादर केले. तसेच संभाजी उद्धव पाटील यांनी मी बाबासाहेब बोलतो हे नाटक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यानंतर संगीतप्रधान प्रबोधन कार्यक्रम घेऊन समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन जयंत निखाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिल्पा सोंडुळे यांनी मानले.

यावेळी उपाध्यक्ष शरद पाईकराव, कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे, यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर, उपाध्यक्ष प्रतिमाताई कांबळे, सचिव स्मिताताई कांबळे, बबन वाघमारे, प्रविण कांबळे, रवी देशकर, छोटू निखाडे, मधुकर निखाडे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, यशोधरा महिला मंडळ व समस्त बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये