अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थापनेची चौकशी करा : आ. अडबाले
सहविचार सभेत ४ प्रकरणे "ऑन द स्पॉट" निकाली ; आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने प्रलंबित प्रकरणांस मान्यता

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थापनेची तात्काळ चौकशी करण्यात यावी व जे अधिकारी, कर्मचारी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रकरणे वेळेत निकाली काढण्यास महाराष्ट्र सेवा हमी कायदा २०१५ चे उल्लंघन करीत असतील, त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या सूचना बुधवारी पार पडलेल्या सहविचार सभेत आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. पातळे यांना दिल्या.
आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या उपक्रमाअंतर्गत शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. चंद्रपूर यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभा बुधवारी मा. सा. कन्नमवार सभागृह, चंद्रपूर येथे पार पडली. यावेळी ४ प्रकरणांना ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले. मागील प्रत्येक सभेत ‘ऑन द स्पॉट’ प्रकरणे निकाली काढली जात असल्याने आमदार सुधाकर अडबाले यांच्या कामगिरीवर शिक्षक – कर्मचाऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.
सभेत प्रवीण धोटे (नेहरू विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर) यांना मुख्याध्यापक पदास सुधारित वेतन श्रेणी, दर्शन गोरंटीवार (जनता विद्यालय पोंभुर्णा), योगेश पाचभाई, प्रीती लांडे (जनता विद्यालय चंद्रपूर) यांना शिपाई पदास सेवासातत्यास ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले.
सभेत जिल्ह्यातील अनुकंपा प्रकरण, मान्यता वर्धित व मंडळ मान्यताबाबत, शिक्षक – कर्मचाऱ्यांचे समायोजन, वेतन, वैद्यकीय देयके, वरिष्ठ / निवड श्रेणी अश्या ७० च्यावर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली.
सभेला शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पातळे, उपशिक्षणाधिकारी गणेश येडणे, वेतन पथक अधीक्षक निकीता ठाकरे, लेखाधिकारी श्री. वडेट्टीवार, म. रा. माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सदस्य लक्ष्मणराव धोबे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर अध्यक्ष दिगांबर कुरेकार, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, जिल्हा उपाध्यक्ष आनंद चलाख, हेमंतकुमार किंदरले, सहकार्यवाह हरिहर खरवडे, जिल्हा कोषाध्यक्ष नितीन जीवतोडे, डॉ. विजय हेलवटे, प्रज्ञा बारेकर, आसमा खान, श्रीहरी शेंडे, शेखर जुमडे, सुरेश डांगे, प्रभाकर पारखी, अनिल कंठीवार, विजय भोगेकर व मोठ्या संख्येने जिल्ह्यातील विमाशि संघाचे सदस्य, समस्याग्रस्त शिक्षक उपस्थित होते.