अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्सच्या सीएसआर अंतर्गत ७ गावांमध्ये राबविले स्वच्छता अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्सच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत दिनांक १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत गवारीगुडा, मानोली, जामनी, बेलमपूर, बॉम्बेझरी, नोकारी आणि पेद्दासापूर या सात गावांमध्ये स्वच्छता जनजागृती अभियान भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले.
या अभियानात एकूण ३४९ ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये नोकारीचे सरपंच सौ. मनीषा पेंदोर, जामनीचे सरपंच श्री. जगदीश किन्नाके, तसेच विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि इतर मान्यवर ग्रामस्थ सहभागी झाले.
अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रमुख उपक्रमांमध्ये:
स्वच्छता रॅली ग्रामस्थांनी हातात घोषवाक्ये घेऊन गावभर फिरून स्वच्छतेचा संदेश दिला.
हात धुण्याचे प्रात्यक्षिक (हँडवॉश मूव्हमेंट) स्वच्छतेसाठी हात धुण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
स्वच्छता श्रमदान झाडू मारून गावाच्या स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष कृती करण्यात आली.
शाळा व अंगणवाड्यांमध्ये विशेष कार्यक्रम – लहान मुलांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती.
झाडांचे वाटप आणि वृक्षारोपण अभियान – स्वच्छतेसोबत हिरवळ वाढवण्यावरही भर देण्यात आला.
या संपूर्ण अभियानाला युनिट हेड श्री. अतुल कंसल, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. मुकेश गहलोत आणि ईआर हेड श्री. नवीन कौशिक यांच्या मार्गदर्शनात यशस्वी करण्यात आले.
ग्रामस्थांनी या सार्थ आणि स्तुत्य उपक्रमाबद्दल माणिकगड सीएसआर टीमचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही अशा जनकल्याणकारी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची हमी दिली.