एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘टेस्ट ओ मानिया’ फूड फेस्टिवल
“चव आणि आरोग्याचा उत्तम संगम विद्यार्थिनींनी साकारला आहे” – डॉ. जयश्री शिंदे

चांदा ब्लास्ट
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल,बल्लारपूर फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी विभागाच्या पुढाकाराने “टेस्ट ओ मानिया” फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. या फेस्टिवलमध्ये “चवी सह पौष्टिक व सकस आहार” हे ब्रीदवाक्य जपले गेले.
दाल-बाटी, चटणी-इडली, मिसळ, उपवासाचे पदार्थ, भेळ, बादाम चाय, ब्रेड रोल, पाणीपुरी, कप केक अशा चटकदार पदार्थांबरोबरच अनेक पौष्टिक पदार्थांची रेलचेल या फेस्टिवलमध्ये पाहायला मिळाली. फूड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेले पदार्थ आकर्षक पद्धतीने सादर करून विक्रीसाठी ठेवले होते. यास उत्तम प्रतिसाद लाभला.
फूड फेस्टिवलचे उद्घाटन डॉ. जयश्री शिंदे (अधिष्ठाता, आंतरविद्याशाखा विभाग, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई) यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विद्यार्थिनींकडून पदार्थ विकत घेतले व त्यांना प्रोत्साहन दिले. या प्रसंगी आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड व समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनीही पदार्थ खरेदी करून विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले.
यानंतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी विविध पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. सर्व मान्यवर व खाद्यप्रेमींनी पदार्थांची गुणवत्ता, सादरीकरण व चव यांना उत्तम दाद दिली.
फूड फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनासाठी सह-प्राध्यापक श्रुतिका राऊत, मोहित पावडे, तोयेश नागपुरे तसेच सर्व प्राध्यापकांचे विशेष सहकार्य लाभले.