ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी आ. जोरगेवार यांचा पुढाकार

जागेच्या आराखड्यावरील अडचण दूर; मोजणीचे निर्देश

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- जिल्ह्यातील युवकांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) नवीन इमारतीच्या उभारणीतील अडथळा दूर करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेतला आहे. जागेचा एकसंध आराखडा नसल्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामाला अडथळा निर्माण झाला होता. ही बाब संस्थेच्या शिक्षकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढला. या बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, तहसीलदार विजय पवार, आयटीआय चे मुख्याध्यापक गजानन राजुरकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल विभागाला जागेची तातडीने मोजणी करून संपूर्ण जागेचा एकत्रित आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जागेची मोजणी करण्यात येणार असून, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला नवीन इमारतीच्या विकासकामांचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही जिल्ह्यातील कौशल्य विकासाचे महत्त्वाचे केंद्र असून, दरवर्षी शेकडो युवक-युवती येथे विविध तांत्रिक व्यवसायांचे प्रशिक्षण घेतात. उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यात या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आधुनिक यंत्रसामग्री, प्रयोगशाळा आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन इमारत उभारण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. मात्र, जागेच्या आराखड्यावरील तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया रखडली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्तक्षेपामुळे आता हा अडथळा दूर होऊन प्रकल्पाला गती मिळणार आहे.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. चंद्रपूरमधील युवकांना आधुनिक तांत्रिक शिक्षणासाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध असून, नवीन इमारतीचे काम कोणत्याही कारणामुळे रखडू दिले जाणार नाही. सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामाला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये