बॉक्सर प्रतीक जंगापल्ले याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!
विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत विजयी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत तालुका क्रीडा संकुल समिती भद्रावती आणि चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती येथे विभागीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिवती तालुक्यातील वणी बू. येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या प्रतीक जंगापल्ले याने विजय प्राप्त केला असून त्याची आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
२३ सप्टेंबरला तालुका क्रीडा संकुल भद्रावती येथे विभागस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा परिषद आणि इतर शाळा संपूर्ण विदर्भातून सहभागी झाल्या होत्या.
यात १४ वर्षाखालील गटात पंचायत समिती जिवती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वणी बु. येथील तीन विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील प्रतीक जंगापल्ले, वर्ग ७ वा याने अंतिम फेरीत विजय मिळवला. त्याची रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेली असून तो नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यामुळे प्रतीकने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसेच वणी बू गावाची मान अभिमानाने उंचावलेली असून त्याच्या या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक व प्रशिक्षक निखिल इंगळे तसेच शिक्षण सेवक निखिल हिवसे, अनिता माने व माधुरी मेश्राम यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
प्रतीक च्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, गटशिक्षणाधिकारी अमर साठे, शिक्षण विस्तार अधिकारी संदीप चौधरी,देवानंद रामगिरकर यांनी सुद्धा प्रतीक चे अभिनंदन केले.