चालबर्डी येथे महास्वच्छता अभियानांतर्गत श्रमदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छता ही सेवा अभियान 2025 अंतर्गत ग्रामपंचायत चालबडी येथे “एक दिवस – एक तास – एक साथ” या घोषवाक्याने स्वच्छता महाश्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गावातील सार्वजनिक रस्ते, आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा परिसर तसेच विविध ठिकाणांची स्वच्छता करून गाव स्वच्छतेचा आदर्श घालून दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. बंडु आकनुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच प्रियंका सोयाम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच गणेश नागपूरे, सदस्य आशु बावणे, सुरेखा न्याहारे, मंजुषा उईके, अंकित बावणे, अमोल कोवे, विस्तार अधिकारी प्रकाश पारखी, गुलाब चहारे, ग्रामपंचायत अधिकारी जयश्री चंदनखेडे तसेच सुरज खोडे उपस्थित होते.
प्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी डॉ. आकनुरवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शासनाच्या समृद्ध पंचायतराज अभियानासोबतच ग्रामस्थांच्या श्रमदान व लोकसहभागातूनच गावात शाश्वत स्वच्छता साध्य होऊ शकते.”
या उपक्रमात ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, जिजाऊ ग्रामसंघातील महिला, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, बचतगट सदस्य, सीआरपी, आंगणवाडी सेविका तसेच लोकविद्यालय शाळेचे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हा उपक्रम उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी जयश्री चंदनखेडे यांनी केले. संचालन सपना पुरमशेट्टीवार यांनी तर आभार प्रदर्शन श्रीराम थुल यांनी केले.