ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी लोकमान्य ज्ञानपीठ येथे डाएट प्लान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        सध्याच्या काळात शाळेत जाणारी लहान मुले कोणतीही भाजी किंवा पौष्टिक आहार घेण्यास टाळाटाळ करतात, अशी अनेक पालकांची तक्रार आहे. मुलांच्या या सवयीमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. केस अकाली पांढरे होणे, अशक्तपणा, त्वचेच्या समस्या, तसेच शारीरिक वाढ खुंटणे अशा अनेक अडचणींना ही मुले सामोरे जात आहेत. या गंभीर बाबीवर उपाय शोधण्यासाठी भद्रावती येथील लोकमान्य ज्ञानपीठ शाळेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

शाळेच्या वतीने १ ली ते १० वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष डाएट प्लान तयार करण्यात आला आहे. यामध्ये मुलांनी दररोज पालेभाज्या, गाजर, बीट, काकडी यांसारख्या भाज्यांसह विविध फळे खाण्याची सवय लावली जाणार आहे. यामुळे मुलांचा शारीरिक व मानसिक विकास योग्य पद्धतीने होईल, असा शाळेचा उद्देश आहे. शाळेत दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत शिक्षक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून त्यांना भाजी व फळे खाण्यास प्रवृत्त करणार आहेत. लहान वयातच योग्य आहाराची सवय लागावी, पौष्टिक अन्नामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शाळेच्या शिक्षकांचा हा प्रयत्न आहे.

शहरातील लोकमान्य ज्ञानपीठ येथे मागील आठवड्यात झालेल्या पालकसभेत अनेक पालकांनी मुलांच्या आहाराबाबत चिंता व्यक्त केली होती. मुलांना भाज्या आवडत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे पालकांनी निदर्शनास आणून दिले. पालकांची ही मागणी लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका पुनम ठावरी यांनी पुढाकार घेत डाएट प्लान तयार केला. यावेळी पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे स्वागत केले व घरीसुद्धा मुलांना पौष्टिक अन्न देण्याची ग्वाही दिली.

लोकमान्य ज्ञानपीठ शाळेचा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. बालपणी लागलेली चांगली सवय मुलांच्या भविष्यातील आरोग्यासाठी मजबूत पाया ठरेल, असा विश्वास पालकांनी व्यक्त केला आहे आहे. या उपक्रमामुळे भद्रावतीतील शाळकरी मुलांना आरोग्यदायी जीवनशैलीची गोडी लागेल आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आजच्या मुलांची जीवनशैली बदललेली आहे. फास्ट फूड व पॅकबंद पदार्थांमुळे त्यांना भाजी व फळांपासून दूर जाण्याची सवय लागली आहे. याचा दीर्घकालीन परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे शाळेच्या माध्यमातून मुलांना योग्य आहाराची सवय लावणे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. 

          -चंद्रकांत गुंडावार, अध्यक्ष, लोकसेवा मंडळ भद्रावती

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये