ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा संकल्प करा – आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी जनसेवेचा संकल्प

चांदा ब्लास्ट

भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा कार्यकर्ता मेळावा

एकात्म मानववादाचे प्रणेते श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांना जीवनध्येय मानून वणी विधानसभा क्षेत्रात कार्य करण्याचा ठाम निश्चय सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावा. “शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे,” या पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या प्रेरणादायी विचारांचा आधार घेत प्रत्येकाने जनसेवेचे व्रत स्वीकारावे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

एस.बी. लाॅन वणी येथे आयोजित भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री अशोक उईके,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार, ललिताताई बोदकूरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, खाडे सर, विजय पिंपळशेंडे, रवि बेलूरकर, कुणाल चोरडीया, श्रीकांत पोटदुखे, मंगलाताई पावडे, संध्याताई अवताडे, उमाताई पिदुरकर, मिराताई पोतराजे, प्रदीप जेऊरकर, निलेश चौधरी, अविनाश लांबट, संतोष डंभारे उपस्थित भाजपाचे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते कामगार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एकात्म मानववाद या मूलभूत तत्त्वांचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज जयंती आपल्यासाठी प्रेरणादायी क्षण आहे. लोकसभा निवडणुकीत मी उभा असताना प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून मेहनत घेतली, त्यासाठी मी सर्वांचा मनःपूर्वक ऋणी आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय हे आमच्या विचारांचे खरे प्रेरणास्थान आहेत. काळानुसार अनेक परिस्थिती बदलतील, पण भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आणि मूल्ये कधीही बदलणार नाहीत.हा विचार आत्मसात करून पक्षाचा आत्मा बनून कार्य करणारे भाजपाचे कार्यकर्तेच खरी ताकद आहेत. वणी विधानसभेतील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता जनतेची सेवा करण्यासाठी पुढे येईल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. या संकल्पयात्रेत मीही पूर्ण शक्तीने ठामपणे सर्वांच्या पाठीशी उभा आहे, आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी कोणतीही कसूर करणार नाही,असा ठाम विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

कोणत्याही देशाची खरी प्रगती केवळ विकासाच्या आकडेवारीत नव्हे, तर शेवटच्या घटकातील गरिबांच्या उन्नतीतून मोजली जाते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी देशाची संपत्ती खर्च होते का, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे, हेच पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे आवडते विचारवाक्य आहे. आपण सर्वजण त्यांच्या विचारांचे पाईक आहोत,” असेही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा झेंडा हाती घेऊन वणी विधानसभा क्षेत्राच्या जनतेची सेवा करण्याचे व्रत घेऊन कार्य करणारे, तसेच 2014 आणि 2019 मध्ये वणी विधानसभेचे नेतृत्व केलेले माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा आज वाढदिवस आहे. माजी आमदार श्री. बोदकुरवार यांनी या मतदारसंघाची मनापासून सेवा केली आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनामनात ‘वणी नगरपरिषद जिंकणारच’ या संकल्पनेची मशाल प्रज्वलित करावी.’ वणी विधानसभा क्षेत्रातील कोणतेही काम असो किंवा विधानसभेत प्रश्न मांडण्याची वेळ असो, त्यासाठी मी पूर्ण ताकद आणि प्रयत्न पणाला लावीन, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये