पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जिवती तहसीलदारांना निवेदन
दोषींवर कठोर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती : त्र्यंबकेश्वर येथे २० सप्टेंबर २०२५ रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत, दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी व्हाईस ऑफ मिडिया व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी जिवती तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
या हल्ल्यात झी २४ तासचे ब्युरो चीफ श्री. योगेश खरे, साम टीव्हीचे श्री. अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे श्री. किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. यात श्री. किरण ताजने गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पत्रकारांवरील अशा वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर गंभीर आघात होत आहे. पत्रकार समाजातील सत्य घटना आणि भ्रष्टाचार उजेडात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय आणि असह्य आहेत,असे निवेदनात नमूद करण्यात आले असून हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करावी,भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस आणि प्रभावी धोरण आखावे.
वरील मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.या प्रसंगी श्री. सुग्रीव गोतावाळे (सकाळ), श्री. शंकर चव्हाण (पुण्यनगरी), लक्ष्मण मंगाम (देशोन्नती), कंटु कोटनाके (दैनिक भास्कर), दीपक साबाने (लोकमत), सलीम शेख (पुण्यनगरी ग्रामीण),सिताराम मडावी (सकाळ ग्रामीण), संतोष इंद्राळे यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.