सेवा पंधरवडा अंतर्गत जिवती तालुक्यात “सर्वांसाठी घरे” उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती : – शासनाच्या सेवा पंधरवडा २०२५ उपक्रमांतर्गत “सर्वांसाठी घरे” या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी जिवती तालुक्यात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील धनकदेवी, कारगाव खुर्द, जांभूळधरा आणि मरकागोंदी या गावांना भेट देऊन घर सर्वेक्षण व अतिक्रमण तपासणी करण्यात आली.
यावेळी संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, तलाठी तसेच ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील कच्च्या घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची माहिती नोंदवून, त्यांना भविष्यात घरकुल योजनेंतर्गत लाभ देण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण राबवण्यात आले. या सर्वेक्षणात घरांची सध्याची स्थिती, अतिक्रमणाची शक्यता, पात्रता निकष व नागरिकांची गरज यांचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. जिवती तालुक्यातील कच्च्या घरे असलेल्या गरजू कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ही कार्यवाही केली जात आहे.
“सर्वांसाठी घरे” या उपक्रमामुळे तालुक्यातील प्रत्येक गरजवंत नागरिकास सुरक्षित, पक्के आणि सन्मानास्पद घर मिळावे, हा शासनाचा उद्देश आहे. या उपक्रमाला स्थानिक ग्रामपंचायतींनी व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, हे विशेष.