नोंदणी झाली ६३९८ ; लाभ केवळ ३७०० शेतकऱ्यांना
बोनसपासून वंचित शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधावा ; सभापती इंद्रपाल धूडसे यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
गोंडपिपरी तालुक्यातील बोनस वाटप प्रकरण
गोंडपिपरी :- राज्यशासनाने जाहिर करून देखील गोंडपिपरी तालुक्यातील हजारो नोंदणीकृत शेतकऱ्यांना अद्याप बोनस मिळाला नाही.तालुक्यातील एकूण ६३९८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.पहिल्या टप्यात केवळ २७०० शेतकऱ्यांना बोनस मिळाला.यामुळे ऐन हंगामात हक्काचा पैसा थांबला.अन् शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.आणि बोनस वितरण प्रकरणी अनियमितता समोर आली.लागलीच गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने तहसीलदारामार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत ही गंभीर बाब लक्षात आणून दिली.यानंतर बोनस वितरणात गती आली.पुन्हा हजार शेतकऱ्यांना बोनसचा लाभ झाला.२७०० चा आकडा ३७०० वर पोहोचला.दप्तर दिरंगाई आणि कोरपना तालुका खरेदी – विक्री सहकारी संस्थेच्या गलथान कारभारामुळे गोंडपिपरी तालुक्यातील हजारो शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.बोनसपासून वंचित शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा,कोणत्याही आमिषाला बळी पडू नये,असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धूडसे यांनी केले आहे.
राज्यशासनाने धान उत्पादक नोंदणीकृत शेतकऱ्यांना हेक्टरी २०००० रुपये बोनस देण्याचे जाहीर केले.यानंतर गोंडपिपरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी धान विक्री करिता नोंदणी केली.आमदार सुधिर मुनगंटीवारांच्या पाठपुराव्यानंतर सरसकट बोनस देण्याचे निश्चितही झाले.निधीही आला,मात्र अद्याप तालुक्यातील हजारो नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही.यामुळे शेतकरी वर्गात एकच तारांबळ उडाली असून नाराजी पसरली आहे.तालुक्यातील ६३९८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असतांना पहिल्या टप्यात केवळ २७०० शेतकऱ्यांना लाभ मिळाला.संवेदनशील आणि गंभीर असलेल्या या प्रकरणाकडे संचालक मंडळाने लक्ष वेधत केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा मार्केटींग फेडरेशन खळबळून जागी झाली.यानंतर हा आकडा हजाराने वाढून ३७०० वर पोहोचला.आजही हजारो शेतकरी बोनसपासून वंचित आहेत.या नोंदणीकृत शेतकऱ्यांची बोनससाठी धावाधाव सुरू आहे.गोंडपिपरी तालुक्यात करंजी येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था आणि कोरपणा तालुका खरेदी – विक्री सहकारी संस्था अश्या दोन संस्थेला धान खरेदीचे कंत्राट मिळाले.अशावेळी करंजी येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळाला.उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदीचे कंत्राट मिळालेल्या कोरपणा खरेदी विक्री सहकारी संस्थेत नोंदणी केली.मात्र संस्थेची दप्तर दिरंगाई आणि गलथान कारभारामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी आजही बोनसपासून वंचित आहेत.ऐन हंगामात पैशाची चणचण असतांना हक्काचा पैसा अडला असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे.पडताळणी सुरू असल्याचे सांगत टप्याटप्याने वितरण होणार असल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडून सांगितले जात आहे.असे असले तरी बोनसपासून वंचित शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा,कोणत्याही आमिषाला बळी पडू नये,असे आवाहन गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धूडसे यांनी केले आहे.
या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे.बोलणेही झाले.लवकरच उर्वरित शेतकऱ्यांना बोनस वितरीत केल्या जाईल.
– शुभम बहाकर,तहसीलदार,गोंडपिपरी.
सद्या शेतीचा हंगाम तेजीत आहे.पावलोपावली बळीराजाला पैशाची नितांत गरज आहे.तातडीने उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनसचे वितरण करावे.
– समीर निमगडे,संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती,गोंडपिपरी.
शेतीवर पोट असणारा हा तालुका.यातही हक्काचा पैसा जाणीवपूर्वक अडविण्यात आला आहे.असे बरे नाही.आठवडाभरात बोनस न मिळाल्यास आंदोलन उभारु
सुरज माडूरवार,तालुकाप्रमुख,शिवसेना(उबठा),गोंडपिपरी.
शेतकरी नेते कुठ आहेत ?
उद्योग विरहित गोंडपिपरी तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना अद्याप बोनस मिळाला नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.अशावेळी नको त्या मुद्यावर राजकारण करून एकमेकांवर आगपाखड करणारे शेतकरी नेते आता कुठे आहेत ? असा सवाल तालुकावासियांकडून विचारला जात आहे.