दारूच्या नशेत “बादशाह”कडून तरुणीचा विनयभंग, अत्याचाराचा प्रयत्न
तरुणीच्या दुचाकीसह मोबाईल घेऊन पसार ; चार दिवसांच्या पाठलागानंतर आरोपी जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंदपिपरी तालुक्यातील वढोली बोरगाव मार्गावर शुक्रवारी (दि.२२) घडलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला असून एका १९ वर्षीय तरुणीवर जबरदस्ती करत तिचा विनयभंग करून लूटमार करणाऱ्या आरोपीला अखेर गोंडपिपरी पोलिसांनी चार दिवसांच्या अथक शोधमोहीमेनंतर अटक केली आहे.
शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास वढोली येथे कामानिमित्य आलेला राजुरा येथील युवक चंद्रपूर परत जात असताना दारूच्या नशेत होता. खिशात पैसे नसल्याने त्याने वढोली-बोरगाव मार्गावरून एकटी जात असलेल्या १९ वर्षीय युवतीला अडवले. आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करत अश्लील वर्तन केले व विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता तिचे दोन मोबाईल फोन, दुचाकी हिसकावून तो घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेनंतर भयभीत अवस्थेत युवतीने एका शेतात धाव घेतली. शेतात काम करत असणारे शेतकरी विनोद तुमडे यांना आपबिती सांगितली. तुमडे यांनी गोंडपिपरी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ घटनास्थळी ठाणेदार रमेश हत्तीगोटे दाखल होऊन घटनाक्रम जाणून घेतला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ६० जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून सातत्याने शोधमोहीम राबवत तांत्रिक पुरावे,मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती (साखरवाही) येथून सचिन उर्फ बादशहा संतोष नगराळे रा.राजुरा या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्यावर ३०९(४), ७६, १२६(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पीएसआय मंगेश कराडे, संतोष निभोरकर, विनोद भुरले, धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, रजनीकांत पुटावार, चेतन गजलवार, विलास कोवे, प्रफुल गारघाटे, सुमित बरडे, सुशील गोंगले, आकाश गुंजकर व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन गोंडपिंपरी व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी संयुक्त कारवाई पार पडली. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.



