वाटपात मिळालेल्या जमीनीचा केला फेरफार
संबधीतावर कारवाईची पत्रकार परिषदेत मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
तालुक्यातील साखरी व सिर्सी माल येथील भुमीहीनांना शासनाकडुन मिळालेल्या पटयाच्या जमीनी अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांनी बेकायदेशीर खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
साखरी व सिर्सी माल येथील भुमीहिनांना सन 1975-76 मध्ये शासनाने जमीनीचे वाटप केले. सदर जमीनी वर्ग 2 मध्ये होत्या, या जमीनीचे लाभार्थ्यांना पट्टे सुध्दा देण्यात आले होते. शेतकऱ्यांची काही काळ जमीनी कसुन त्यात उत्पादन घेतले परंतु आर्थिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांनी ठेक्याने दुसऱ्यास जमीनी कसण्यास दिल्या होत्या. शेतकऱ्यांचा अशिक्षीतपणा व साधेपणाचा फायदा घेत व संबधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी घेवून अवैध सावकारीचा व्यवसाय करणारे ठेक्याने दिलेल्या जमीनीचा बेकायदेशीर फेरफार करुन त्या जमीनी आपले व आपल्या नातलगाच्या नावे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे मुळ पट्टेधारकावर भुमीहीन होण्याची वेळ आलेली आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे वाटपात दिलेल्या जमीनीची खरेदी विक्री करता येत नसतांनाही शासकीय कम्रचाऱ्यांनी आर्थिक प्रलोभणापोटी फेरफार केल्याचे निष्पन्न झाले आहे. सातबारा उताऱ्यावर पट्टेधारकांना संबधीत कार्यालयात न बोलविता परस्पर फेरफार कोणत्या आधारावर करण्यात आला? वर्ग 2 च्या जमीनीचा फेरफार करता येतो का? असाही आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. तर या प्रकरणाशी संबधी असणाऱ्यावर कठोर कारवाई करुन आमच्या जमीनी आम्हाला परत देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.
या संबधात शेतकऱ्यांनी विद्यमान तहसिलदार यांना तक्रार दाखल केली परंतु यावर कोणतीही कारवाई न झाल्याने जिल्हाधिकारी यांना तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीवर जिल्हाधिकारी यांनी सावलीचे तहसिलदार यांना गैरअर्जदारांनी अवैध सावकारी व्यवसाय करुन शासनाने वाटप केलेल्या पटयाच्या जमीनी खरेदी केल्याची चौकशी करुन गैरअर्जदारावर कायदेशीर कारवाई करावी व तसा अहवाल अर्जदार यांना देण्यात यावा असे कळविले असतांना सुध्दा तहसिलदारांनी कोणतीही चौकशी केलेली नाही व अहवाल सुध्दा संबधीतांना अहवाल सादर केलेला नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या पत्राला सावलीचे तहसिलदारांनी केराची टोपली दाखविल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.