वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
तालुक्यातील भामडेळी येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शेतात काम करीत असलेल्या एका शेतकऱ्यांवर जवळच दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन त्याला ठार केल्याची घटना दिनांक २४ रोज बुधवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील भामडेळी येथील शेतशिवारात घडली.
अमोल नन्नावरे, वय ४० वर्ष, राहणार भामडेळी असे या मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परीसरातील गावकऱ्यात व शेतकऱ्यांमधे भितीचे वातावरण पसरले आहे. भामडेळी गाव हे ताडोबा अंधारी व्याघ्र परीसरातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात येत असुन गावपरीसरात जंगल आहे.
या जंगलात वन्यप्राण्यांची संख्या भरपूर असल्याने येथील गावकऱ्यांत सततची चिंता असते. घटनेच्या दिवशी अमोल नन्नावरे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करीत असतांना वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.