ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चारगाव (बु) सहकारी संस्थेच्या नव्या इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

सहकार क्षेत्रातील प्रत्येक सहकारी संस्थेच्या पाठीशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खंबीरपणे उभी - रवींद्र शिंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. चारगाव (बु), तालुका वरोरा यांच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळाच्या भव्य कार्यक्रम दि 20ला मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा. अध्यक्ष तथा सहकार क्षेत्रातील खंदे नेतृत्व रवींद्र शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रवींद्र शिंदे म्हणाले की, “सहकार क्षेत्रातील प्रत्येक सहकारी संस्थेच्या पाठीशी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खंबीरपणे उभी आहे. सभासद, शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी बँक सातत्याने कार्यरत आहे. सहकार हे केवळ आर्थिक प्रगतीसाठी नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचेही शक्तिशाली साधन आहे.”

या प्रसंगी संस्थेच्या वतीने रवींद्र शिंदे यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील सहकारी संस्थांना दिलेले भक्कम सहकार्य, शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय व सहकार क्षेत्रात निर्माण केलेला विश्वास यामुळे त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी ठरत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

उद्घाटन सोहळ्यात बँकेचे संचालक व कर्ज समिती वरोरा विभाग अध्यक्ष जयंत टेमुर्डे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी माजी नगरसेवक तथा भद्रावती नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष आमणे, संस्थेचे अध्यक्ष दयारामजी नन्नावरे, उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा संचालक अभिजीत पावडे, संस्थेचे सचिव प्रभाकर हनवते, संचालक मंडळ, गट सचिव, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने चारगाव (बु) सहकारी संस्थेच्या विकास यात्रेत एक नवा अध्याय सुरू झाला असून सहकार चळवळ अधिक भक्कमपणे पुढे नेली जाईल, असा विश्वास उपस्थित सभासद व नागरिकांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये