कोरपना पोलिस ॲक्शन मोडवर
उड्डाण पुलावर हुल्लडबाजी केल्यास कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना, वनसडी व पारडी येथे नुकत्याच बांधलेल्या उड्डाण पुलावर तरुण मंडळींनी गोंधळ, स्टंटबाजी, बर्थडे पार्टी व हुल्लडबाजी करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरपना पोलिसांनी कठोर भूमिका घेत मोहीम उभारण्याचे ठरविले आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, उड्डाण पुलावर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाईल. यासोबतच वाहतूक शिस्त भंग करणाऱ्यांवरही धडक कारवाई केली जाणार आहे.
यात प्रामुख्याने विना हेल्मेट दुचाकी चालविणे, विना लायसन्स दुचाकी व चारचाकी चालविणे, ट्रिपल सीट प्रवास, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे, कानठळ्या बसविणारे कर्णकर्षक हॉर्न वापरणे, फटाका सायलेन्सर बसवून ध्वनीप्रदूषण करणे, पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहने चालविणे, या सर्व प्रकारांवर विशेष मोहीम राबविली जाणार
असून, नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अपघात टाळण्यासाठी व सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करावे, अन्यथा दंड आणि कारवाईला सामोरे जावे लागेल.
विनाहेल्मेट दुचाकी चालविण्यासह वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तीवर धडक मोहीम आमच्या विभागाकडून सुरू केली आहे. यावर वाहतुकीच्या सुरक्षितेच्यादृष्टीने नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे व कायद्याचे पालन करावे. असे आवाहन कोरपणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाडे निरीक्षक यांनी केले आहे