पूरग्रस्तांची उच्च न्यायालयाने घेतली दखल
दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा जिल्हा प्रशासनाला आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील अनेक गावे सध्या पुरामुळे बुडाली आहेत. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, घरे उद्ध्वस्त झाली, तर हजारो कुटुंबांची उपजीविका धोक्यात आली आहे. या मानवनिर्मित आपत्तीला कारणीभूत ठरलेल्या वेकोलीच्या शिरना व वर्धा नदीकाठावरील बेकायदेशीर ओव्हरडंपविरोधात दाखल याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किल्लोर व न्यायमूर्ती व्यास यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिला. या लढ्याला दिशा देत पूरग्रस्त शेतकऱ्यांची बाजू उच्च न्यायालयात अधिवक्ता ॲड. दीपक चटप यांनी मांडली.
न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावत दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर शासकीय वकिलामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पुरग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. या आदेशामुळे ग्रामस्थांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे.