अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरने घेतला एकाचा बळी
३६ तासात वाहनासह आरोपीला पोलिसांनी केली अटक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी : नागभीड तालुक्यातील मौशी येथे मंडई निमित्त आलेल्या जावयाला रेती तस्करीतील ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याची घटना दि. १५ च्या सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली होती. अपघातात वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने लहरी श्रावण कामडी (५०) रा.तुलानमेंढा ता. ब्रम्हपुरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. ब्रम्हपुरी पोलिसात तक्रार दाखल कारन्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या ३६ तासात वाहनासह आरोपी चालकास ताब्यात घेतले .
शनिवारला मौशी गावात मंडईचा कार्यक्रम असल्याने मंडई पाहण्याकरीता लहरी कामडी रा तुलानमाल हे मौशी येथे मुक्कामाने आले होते. दि. १५ ला सकाळी तक्रारदार साळा व एक जावई तसेच दुसरे जावई मृतक लहरी कामडी यांच्यासह शौचालयाला दुचाकी मोटारसायकल प्लॉटीना एम. एच ३४ डब्ल्यू ४७०६ या दुचाकीवर बसुन मौशी ते तोरगांव जाणा-या रोडवरील पुलावर गेले होते.एक जावई शौचाला गेले तर साळा व दुसरे जावई लहरी कामडी हे गाडीच्या आसपास पुलावर फिरत असतांना ९.३० वाजताच्या दरम्यान एका निळ्या रंगाच्या विनानंबराचा ट्रॅक्टर वाहणाने नान्होरी कडुन येणाऱ्या कालव्याच्या रस्त्याने येऊन ट्रॅक्टर भरधाव वेगाणे, हयीगयीने व निष्काळजीपनाने चालवुन लहरी कामडी यांना पुलावर जोराची धडक दिली.
अपघातात डोक्यावरुन ट्रॅक्टरचा चाक गेल्याने डोके चेंदामेंदा झाले तर अज्ञात विनानंबरचा ट्रॅक्टर चालक गोसीखुर्द उजवा कालवाच्या जाणा-या रस्त्याने पळून गेला.अशी तक्रार पोलीस ठाणे ब्रम्हपुरी येथे फिर्यदिने दाखल केली. महाराष्ट्र मोटर वाहन कायदा कलम १३४,१८४ बी एन एस कलम १०६(१), २८१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तालुक्यातील अवैध रेती तस्कर व भरधावं रेती वाहनाने नागरिक त्रस्त व भयभीत असून वारंवार घडत असलेल्या अपघाताच्या घटनांतून मुक्तता मिळावी याकरिता शासन – प्रशासनाने उपाययोजना कराव्यात व मोलमजुरीने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा, घरातील कर्ता पुरुष व अल्पवयीन मुलगा, मुलगी व पत्नीचा आधार असलेल्या मृतक लहरी कामडी यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातून होतं आहे.
*आरोपिला अवघ्या दीड दिवसात अटक*
पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण यांनी अपघातास जबाबदार अवैध रेती तस्करीतील ट्रॅक्टर व चालक आरोपीला अवघ्या दीड दिवसात ताब्यात घेतले.ट्रॅक्टर मालक अमोल पांडुरंग पिलारे रा. अर्हेर नवरगाव ता. ब्रम्हपुरी याच्या एम. एच. ३४ सी. डी. ३३६५ क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर चालक आरोपी प्रकाश अर्जुन ठेंगरे रा.अर्हेर-नवरगाव ता. ब्रम्हपुरी हा होता. यापूर्वीसुद्धा या चालकाने एक मोठा अपघात केला असल्याची माहिती आहे.