ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबोधी, महू व दीक्षाभूमी बौद्धांकडेच द्या!

ऐतिहासिक व धार्मिक स्थळांवरील असंवैधानिक कब्जाविरुद्ध तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- भंते अनागारिक धम्मपाल, पेरियार स्वामी जयंती आणि भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनाच्या औचित्याने बौद्ध समाजाच्या धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक हक्कांसाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात १७ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यव्यापी “आक्रोश आंदोलन” करण्यात आले. या आंदोलनाच्या समर्थनार्थ व मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी, जिवतीच्या वतीने तहसीलदार जिवती यांच्यामार्फत बिहार, मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन तातडीने सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली.

     निवेदनातून १) बोधगया (बिहार) येथे भगवान बुद्धांना बुद्धत्त्व प्राप्त झालेल्या महाबोधी महाविहाराचे पूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे. १९४९ मधील बोधगया मंदिर अधिनियमानुसार समितीत बौद्धांचे अल्पसंख्य प्रतिनिधित्व असून, हे संविधानाच्या अनुच्छेद २५, २६ व १३ चे उल्लंघन आहे.

यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचा समावेश व्यवस्थापन समितीत बंधनकारक करावा, २) महू (मध्यप्रदेश) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी उभारण्यात आलेल्या स्मारकाचे सध्याचे व्यवस्थापन बाबासाहेबांच्या विचारधारेच्या विरोधात कार्यरत आहे. “जयभीम” च्या जागी इतर घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे स्मारकाचे नियंत्रण दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कडे सुपूर्द करावे व ३) दीक्षाभूमी (नागपूर) मूळ शासकीय मान्यता यशवंतराव आंबेडकर (बाबासाहेबांचे सुपुत्र) यांच्या नावावर असताना सुद्धा, आज समितीकडून असंवैधानिक कब्जा व विद्रूपिकरण होत आहे. दीक्षाभूमीचे संपूर्ण व्यवस्थापन डॉ.भीमराव य. आंबेडकर व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडे सुपूर्द करण्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन मा.राष्ट्रपती, मा.पंतप्रधान आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडेही पाठवण्यात आले आहे.

    निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभा जिवतीचे तालुकाध्यक्ष दिपक साबने, शहर उपाध्यक्ष नभिलास भगत, तालुका सरचिटणीस प्रा.चंदू रोकडे, शहराध्यक्ष व्यंकटी कांबळे, शहर सरचिटणीस शरद वाटोरे, वंचितचे तालुकाध्यक्ष बालाजी सोनकांबळे, किर्लोस गायकवाड, रामदास रणवीर, बळीराम काळे, प्रदीप काळे, प्रशांत कांबळे, शुद्धोधन निखाडे, कल्याण सरोदे, संघपाल जीवने यांचेसह अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये