सिंदखेडराजा मतदार संघात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची डॉ. शशिकांत खेडेकर यांची उप मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिंदखेडराजा मतदार संघात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे (15 व 16 सप्टेंबर) ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने थैमान घातले असून, आमना नदीची पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात घुसले तर सावखेड तेजन, सिंदखेड राजा, किनगाव राजा देऊळगाव राजा, देऊळगाव मही, मेरा, साखरखेर्डा, शेळगाव आटोळ या भागात पिकांचे व शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अनपेक्षित निसर्ग आपत्तीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांच्यावर उपजीविकेचे मोठे संकट कोसळले आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी उपमुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यांनी शेतकऱ्यांचे हाल थांबवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अशी आग्रही विनंती उपमुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह अन्य मंडळी यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या परिस्थितीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पावसामुळे सिंदखेड राजा व बुलढाणा जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे त्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानंतर नुकसानभरपाईचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांना शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.