वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
लाखापूर येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी : उत्तर ब्रम्हपुरी वनपरीक्षेत्रातील उपक्षेत्र ब्रम्हपुरी, नियतक्षेत्र सायगाटा भागात मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ४.३० वाजता वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी ठार झाला.
मृत व्यक्तीचे नाव सुनील ऊर्फ प्रमोद बाळकृष्ण राऊत (वय ३२, रा. लाखापूर) असे आहे. ते नेहमीप्रमाणे लाखापूरच्या जंगलात गुरे चारण्यासाठी गेले होते. गुरे चारून परत येत असताना, झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात सुनील राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. काल सुनील घरी आला नाही म्हणून गावकऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु काल मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शोध मोहीम थांबवली व आज सकाळी शोध मोहीम सुरू केली असता गावापासून दोन किलोमीटर अंतरावर जंगलात सुनीलचा मृतदेह आढळून आला.
घटनेनंतर लाखापूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे. वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील व एक मुलगी असा परिवार आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोणताही पंचनामा न करता मृतदेह पोस्टमार्टमसाठी हलविण्यात आला. लाखापूर परिसराला लागून सुमारे ६०० एकर जंगल असून त्यात ११ वाघ असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शिकार अभावी हे वाघ गावात शिरून माणसांवर हल्ला करतात, असा त्यांचा आरोप आहे.
या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.