वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन युवकाची आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली आहे. यामध्ये मृत झालेल्या युवकाचे नाव रुपेश गुणवंत भर्रे वय २५ वर्ष रा.किन्ही तह. ब्रम्हपूरी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपूरी तालुक्यातील किन्ही येथील रहिवासी असलेला रुपेश भर्रे हा युवक काल दि. १३ सप्टेंबर रोजी घराजवळील एका मुलाला घेऊन सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गांगलवाडी-आरमोरी टी पॉइंट कडे आपल्या दुचाकीने फिरायला गेला होता. त्यानंतर तेथील वैनगंगा नदीच्या पुलावरून अचानक उडी घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार अंकुश आत्राम हे अन्य पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहिस्तोवर सदर युवकाचा मृतदेह सापडुन आला नव्हता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. या युवकाचे तीन महीन्यांपुर्वी लग्न झाले ह़ोते.
प्रशासनाची असंवेदनशीलता
सदर युवकाने नदीत उडी घेतल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटना घडली तेव्हा रात्र असल्याने आपत्ती व्यवस्थापनचे शोध पथक पोहचु शकले नसले तरी दुसऱ्या दिवशी शोध पथक मृतदेह शोधण्यासाठी त्याठिकाणी पोहचणे अपेक्षित होते.
मात्र दुसऱ्या दिवशी (१४ सप्टेंबर) शोध पथक आले नाहीत. त्यामुळे सदर युवकाच्या गावातील गावकऱ्यांनी आपल्या परीने नदीच्या काठाने मृतदेहाचा शोध घेणे सुरू केले.
त्यासाठी त्यांनी स्थानिक मच्छीमारांची मदत घेतली. मात्र घटनेशी संबंधित प्रशासनाने यामध्ये कुठलीही संवेदनशीलता दाखविल्याचे दिसले नाही. त्यामुळे प्रशासन किती तत्पर आहे हे मात्र दिसून आले.