संगम विद्यालयात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- उद्याचा भारत घडवणाऱ्या तरुण पिढीमध्ये दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर वेळेत नियंत्रण मिळवण्याची गरज आहे, म्हणून तालुक्यातील वणी बु. येथील संगम विद्यालयात व्यसनमुक्ती प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, महिला, युवती, युवक यांच्यामध्ये व्यसनांचे प्रमाण, तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण जीवनाला हानीकारक आहे. शाळकरी मुलेही आता व्यसनांच्या विळख्यात सापडत आहेत. विविध प्रकारची व्यसने शाळकरी मुलांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे काही बालके गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहेत. बालगुन्हेगारीचे प्रमाण यामुळे वाढत आहे. याचे दुष्परिणाम सामाजिक जीवनात दिसून येत आहेत. व्यसनांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वणी बु. येथील संगम विद्यालयात विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी, विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास फड, वणी बु.येथील चर्च चे फादर व सिस्टर, गुणवंत कांबळे, सहाय्यक शिक्षक दशरथ कुंटेवाड यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना दशरथ कुंटेवाड म्हणाले, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी व्यसनांचे दुष्परिणाम समजून घेतले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे दूत होऊन समाजात गेले पाहिजे. व्यसनमुक्तीचा संदेश समाजात दिला पाहिजे असे सांगितले. यावेळी मुख्याध्यापक फड, गुणवंत कांबळे इतर पाहुण्यांनी ही विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली आणि तंबाखूजन्य पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.