महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हा काळा कायदा!
चंद्रपुरात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयक २०२४ विरुद्ध आज चंद्रपूरच्या गांधी चौकात महाविकास आघाडीने तीव्र आंदोलन केले. हे विधेयक लोकशाहीच्या मूल्यांना मुठमाती देणारे असून, हुकूमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालणारे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विरोधकांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ असे ठामपणे घोषित केले आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे सुरेश पचारे, कम्युनिस्ट पक्षाचे अरुण भेलके, तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनात सहभागी सर्व मान्यवरांनी एकमुखाने सांगितले की, “राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा कायदा घाला घालतो. आधीच अस्तित्वात असलेल्या कायद्यांद्वारे सुरक्षा व्यवस्थापन शक्य आहे; त्यामुळे नवीन कायद्याची गरजच नव्हती. हा कायदा नक्षलवाद्यांच्या नावाखाली जनतेचा आवाज दडपण्यासाठी वापरण्यात येणार आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना, पत्रकारांना तुरुंगात डाकण्यासाठी या कायद्याचा गैरवापर होईल. जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. जर हा कायदा मागे घेतला गेला नाही, तर राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.