पीडब्ल्यूडी विभागाच्या कामांवर उठले प्रश्न
शेनगाव–सोनेगाव मार्गाची दयनीय अवस्था

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) : जिल्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) विविध भागांमध्ये रस्ते बांधकामाची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी ही कामे गेल्या कित्येक वर्षांपासून कासवगतीनेच सुरू असल्याची स्थिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून आता या कामांमध्ये होत असलेल्या हलगर्जीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याचे ताजे उदाहरण म्हणजे शेनगाव–सोनेगाव मार्ग. अवघ्या एक किलोमीटरच्या परिसरात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. परंतु, पावसाळ्यात या रस्त्याची खरी गुणवत्ता उघडकीस आली आहे.
भास्कर सोनेकर (युवा नेते, काँग्रेस, शेनगाव) यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, अवघ्या छोट्या वाहनांचा वावर असूनही रस्ता इतक्या लवकर खराब होणे म्हणजे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे. त्यांनी या रस्त्याची चौकशी करून नियमांनुसार काम झाले आहे की भ्रष्टाचार झाला आहे, हे स्पष्ट करण्याची मागणी केली.
सोनेकर यांनी पुढे असेही सांगितले की, भविष्यात कोणत्याही रस्त्याचे काम करण्यापूर्वी तांत्रिक तपासणी अनिवार्य करण्यात यावी. त्यामुळे जनतेच्या पैशाचा योग्य वापर होईल आणि पुन्हा पुन्हा रस्ते खराब होण्याच्या समस्येतून सुटका मिळेल.