ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृत्रिम कुंडात 6426 गणेश मूर्तींचे विसर्जन

3 पीओपी मूर्तींचा समावेश – विसर्जन स्थळी प्रथमोपचार सुविधा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : श्री गणेशोत्सव विसर्जन सोहळा प्रशासन, गणेश मंडळे व नागरिक यांच्या सहकार्याने उत्साहात व शांततेत पार पडला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांनी या काळात उत्कृष्ट कामगिरी बजावली.

शहरात नागरिकांना सोयीसाठी महानगरपालिकेतर्फे 25 कृत्रिम कुंड व 3 फिरते विसर्जन कुंड उभारण्यात आले. यामध्ये यावर्षी एकूण 6426 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. फिरत्या विसर्जन कुंडात 180 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले, ज्यात 3 पीओपी मूर्तींचा समावेश होता. तसेच, इरई नदी परिसरातील मोठ्या कुंडात 136 मूर्ती तर नदीपात्रात 2 मोठ्या मूर्तींचे विसर्जन सकाळी 10 वाजता करण्यात आले.

विसर्जनस्थळी काही नागरिकांना अस्वस्थ वाटल्याने तसेच काहींना किरकोळ दुखापत झाल्याने तात्काळ प्रथमोपचाराची सोय करण्यात आली. गांधी चौक, जटपूरा गेट व दाताळा रोड या मुख्य विसर्जन स्थळी अँब्युलन्सची व्यवस्था होती. तसेच पोलिसांनी विसर्जन सोहळा शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली.

व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मनपाचे अग्निशमन व स्वच्छता कर्मचारी 3 शिफ्टमध्ये कार्यरत होते. विसर्जन होताच शहर व स्थळांची तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 72 विसर्जन मार्गांवर व 16 विसर्जन स्थळी असे एकूण 88 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात आले, त्यामुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही.

विसर्जन स्थळ परिसरात सिमेंटचे रॅम्प तयार केल्यामुळे चिखल टळला व सर्वांना सुरळीत प्रवेश मिळाला. प्रत्येक मंडळाची स्वतंत्र नोंद घेऊन प्रवेश दिल्याने गर्दी नियंत्रण साधले गेले. मूर्ती विसर्जनासाठी धार्मिक विधी पार पाडण्यासाठी सर्व मंडळांना पुरेसा वेळ देण्यात आला. तसेच मोठ्या क्रेन्सची व्यवस्था असल्याने मूर्ती सुरक्षितरीत्या विसर्जित करण्यात आल्या.

या संपूर्ण व्यवस्थेसाठी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रवार, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, सहायक आयुक्त अनिलकुमार घुले, डॉ. अमोल शेळके, रवींद्र कळंबे, राहुल पंचबुद्धे इत्यादी अधिकारी-कर्मचारी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रत्यक्षरित्या उपस्थित राहून देखरेख करत होते.

यामुळे विसर्जन सोहळा यशस्वी, शांततापूर्ण व सुरळीत पार पडला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये