“ग्रामस्थांसाठी रेल्वे पूल तातडीने खुला करावा” – दिनेश दादापाटील चोखारे
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट
ताडाळी, साखरवाही व येरुर या गावांना जोडणारा पूर्णत्वास आलेला रेल्वे पूल तातडीने जनतेसाठी खुला करावा, अशी ठाम मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादापाटील चोखारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.
चोखारे यांनी निवेदनात नमूद केले की – “विमला रेल्वे सायडिंगमुळे कोळशाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असून त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. धुळकणामुळे प्रदूषण वाढले असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. रेल्वे गेट वारंवार बंद राहिल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व रुग्णवाहिका अडकतात. अशा परिस्थितीत हा पूल सुरू झाल्यास पर्यायी व सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.”
तसेच, शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेसाठी हा पूल जीवनदायी ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवेदन सादर करताना उपस्थित ग्रामस्थांनी शासन व संबंधित विभागाकडून होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पूर्णत्वास आलेला पूल अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने नागरिकांना त्याचा लाभ मिळत नाही, याबद्दल ग्रामस्थांत असंतोष आहे.
ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे की – “शासनाने व लोकप्रतिनिधींनी तातडीने कार्यवाही करून पुलाचे औपचारिक उद्घाटन करून तो वापरासाठी खुला करावा.”