खा. धानोरकर यांची ओबीसी कल्याण समितीवर पुनर्नियुक्ती

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांची इतर मागासवर्गीयांच्या कल्याण विषयक समितीवर (२०२५-२६) सदस्य म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी या समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भक्कम आवाज ऐकायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकसभा सचिवालयाने १ सप्टेंबर, २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले.
ही महत्त्वाची समिती २९ ऑगस्ट, २०२५ रोजी ‘समाचार भाग-दोन’ द्वारे जाहीर करण्यात आली होती. लोकसभा अध्यक्षानी या समितीच्या अध्यक्षपदी खासदार गणेश सिंह यांची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांना दुसऱ्यांदा या समितीवर संधी मिळाल्यामुळे त्यांच्या मागील कामाची दखल घेतल्याचे स्पष्ट होते. याआधीही त्यांनी संसदेत ओबीसी समाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. विशेषतः ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना यांसारख्या लोकहितकारी विषयांवर त्यांनी सातत्याने जोर दिला होता. त्यांची ही पुनर्नियुक्ती ओबीसी समाजाच्या हितासाठी एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.