काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांची चंद्रपूर शहर व जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांची चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र प्रदेश काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी प्रभारी नेमण्यात आले असून ब्रह्मपुरी व वरोरा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून आ. वंजारी यांच्यावरच जबाबदारी देण्यात आली आहे. राजुरा विधानसभेसाठी हैदर अली दोसानी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी श्री. मुजीब पठाण (नागपूर), बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी उमाकांत अग्निहोत्री, तर चिमूर विधानसभा क्षेत्रासाठी श्री. विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी या नियुक्तीचे पत्र जारी केले असून, जिल्हा प्रभारी व विधानसभा प्रभारी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी तातडीने संपर्क साधून संघटनात्मक बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजाला नवे बळ मिळेल, तसेच आगामी राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.