आधुनिक तंत्रज्ञानाने सर्वेक्षण करा – आ. जोरगेवार
कायमस्वरूपी पट्टे देण्याच्या पक्रीयेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेऊन या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा बैठक घेत महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार, तहसीलदार विजय पवार, घुग्घुस नगरपरिषद कार्यकारी अधिकारी रांजनकर, नगररचना विभागाचे प्रतीक जिवतोडे, राहुल भोयर यांच्यासह भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, महामंत्री रवि गुरनुळे, श्याम कणकम, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, विनोद खेवले, माजी नगरसेवक देवानंद वाढई, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, शीतल गुरनुळे, कल्पना बबुलकर, राशिद हुसेन, विठ्ठल डुकरे, अरुण तिखे, प्रज्ञा बोरगमवार, हेमंत उरकुडे, संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, साजन गोहने, मुन्ना लोडे आदींची उपस्थिती होती.
आ. किशोर जोरगेवार यांनी बैठकीत म्हटले की, सर्वेक्षणाची प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्वरित पूर्ण करावी. ठरविण्यात येणाऱ्या नवीन नियुक्त एजन्सींनी ठरविलेल्या वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक असून प्रशासनाने या कामावर सातत्याने देखरेख ठेवावी. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला न्याय मिळावा यासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया पारदर्शक ठेवावी. नझूल जमिनीवरील घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या मूळ रहिवाशांची हक्काची नोंद होणे आवश्यक आहे. कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे. सर्वेक्षण व पट्टावाटपाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळावा, हे आपले ध्येय असावे. पारदर्शकता व विश्वास निर्माण होण्यासाठी स्थानिक जनतेला प्रक्रियेची माहिती सतत देत राहावी, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.
चंद्रपूर शहरातील एकूण ३९ झोपडपट्ट्या नझूल जमिनीवर असल्याची नोंद मनपाकडे आहे. त्यापैकी दोन झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे. यासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्याचा कंत्राट महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर ५२३ नागरिकांनी पट्ट्यासाठी प्रस्ताव सादर केल्याची माहिती यावेळी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. सदर नागरिकांना लवकर पट्टे वाटप करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.