जि.प. टेकामांडवा शाळेत स्वयंशासन दिन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती तालुक्यातील जि.प. उच्च प्राथ केंद्र शाळा टेकामांडवा या शाळेमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधत स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाचा अनुभव देण्यात आला.
विद्यार्थ्यांनीच मुख्याध्यापक, सेवक आणि शिक्षक या भूमिका बजावल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला आणि त्यांच्यातील नेतृत्वाची व प्रशासकीय कामाची कौशल्य विकसित करता आली. विद्यार्थ्यांनी दिवसभर मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळून शाळेचे कामकाज चालवले. कु साईश्रद्धा श्रीराम भगत इ ७ वी या विद्यार्थिनीने मुख्याध्यापकाची भूमिका घेऊन प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली.तर इ ७ वि तील विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले.
दिवसभरात विद्यार्थ्यांनी इ १ ली ते ६ वी च्या विविध तासिका घेतल्या आणि इतर प्रशासकीय कामांमध्येही सक्रिय सहभाग घेतला. या एका दिवसाच्या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांची भूमिका कशी असते याची जाणीव झाली आणि शालेय कामकाजाची जबाबदारी याची जाणीव निर्माण झाली असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना अविस्मरणीय अनुभव मिळाला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पवार हे होते तर मार्गदर्शक म्हणून दिपक गोतावळे उपस्थित होते.संपूर्ण दिवसभराचे नियोजन शाळेतील शिक्षक जी एस पांचाळ,पायल कुकडे,जयश्री घोळवे यांनी उत्तमरित्या केले.