भद्रावतीत गणरायाचे ऊत्साहात विसर्जन
गणपती बाप्पा मोरया म्हणत गणेशभक्तांनी दिला बाप्पाला निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशांचे मोठ्या उत्साहात गवराळा तलावात विसर्जन करण्यात आले.यावेळी गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. सायंकाळी सहा वाजेपासून आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट केलेल्या रथामधुन शहरातील विवीध सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली.ढोल,ताशे तथा डिजेच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकींमधे हजारोंच्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले होते.
रात्रो आठ वाजताच्या दरम्यान सर्व मंडळांचे गणपती मुख्य रस्त्यावर येऊन गांधी चौकात गोळा झाले. यावेळी गणेशांचे दर्शन घेण्यासाठी व मिरवणुका बघण्यासाठी शहरातील नागरीकांनी मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी केली होती.मुख्य रस्त्यावर शिवसेना,भाजप,कांग्रेस पक्षांतर्फे स्वागत मंडप ऊभारुन गणेशमंडळांचे स्वागत केले व सन्मानचिन्ह देऊन मंडळांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर गवराळा तलावात मोठ्या उत्साहात गणेशांचे विसर्जन करण्यात आले.
विसर्जन सोहळा शांततेत व सुव्यवस्थेत पार पडावा यासाठी नगरपरिषद प्रशासनातर्फे विसर्जन स्थळी योग्य सुविधा ऊपलब्ध करण्यात आल्या होत्या तर पोलीस प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शहरातील गणेश विसर्जन शांततेत पार पडले.