नगरपरिषदेकडून शुद्ध पिण्याच्या पाण्याबाबत निष्काळजीपणा
बसपचा इशारा

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपुर : शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या नगरपरिषद प्रशासनच्या निष्काळजीपणाविरोधात बहुजन समाज पार्टीने आवाज उठविला आहे.
घुग्घुस शहरात नगरपरिषदेमार्फत विविध वॉर्डांमध्ये आर.ओ.प्लांट उभारण्यात आले होते. नागरिकांना केवळ १० रुपयांत १५ लिटर शुद्ध पाणी मिळत होते. मात्र, सध्या अनेक ठिकाणी हे प्लांट बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित वेळेत फिल्टर पार्ट्स व दुरुस्ती न केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर नागरिकांकडून दररोज घेतली जाणारी रक्कम नेमकी संबंधितकडे जाते का, की नगरपरिषदेतर्फे वेगळा मोबदला दिला जातो, याबाबतही मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.
बहुजन समाज पार्टीचे घुग्घुस शहराध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुरला यांनी नगरपरिषद प्रशासक यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली की,
सर्व बंद पडलेले आर.ओ. प्लांट तातडीने सुरु करावेत. नागरिकांकडून वसूल होणाऱ्या रकमेबाबत पारदर्शकता ठेवून माहिती जनतेसमोर मांडावी. आवश्यक असल्यास नगरपरिषदेमार्फतच थेट शुद्ध पाणीपुरवठा करावा.
अन्यथा या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.