चंद्रपूरचा विसर्जन सोहळा म्हणजे श्रद्धा, शिस्त आणि उत्साहाचा अद्वितीय संगम – आ. मुनगंटीवार
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील गणेश विसर्जन सोहळ्यातील शिस्तबद्धतेचे केले कौतुक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगरपालिका, गणेश मंडळे आणि पोलिस प्रशासनाचे उत्तम नियोजन
हजारो भक्तांनी श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहाने दिला गणरायाला निरोप
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन सोहळा यंदाही भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहाने उजळून निघाला. हजारो गणेश भक्तांनी शांततेत आणि शिस्तीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. आकर्षक देखावे, चौकाचौकांतून निनादणारा “गणपती बाप्पा मोरया” चा जयघोष, आणि भक्तांच्या डोळ्यांत दाटलेले भावनिक क्षण या सर्वांनी एक अविस्मरणीय वातावरण निर्माण केले. चंद्रपूरचा विसर्जन सोहळा म्हणजे श्रद्धा, शिस्त आणि उत्साहाचा अद्वितीय संगम ठरला असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महानगरपालिका प्रशासन, पोलिस दल, गणेश मंडळे तसेच नागरिकांचेही आ.मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक केले.
चंद्रपूर शहरातील भव्य गणेश विसर्जन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत आमदार मुनगंटीवार सहभागी झाले. गणेश भक्तांना भेटत त्यांना शुभेच्छा देत मंचावरून त्यांच्याशी संवाद साधला. शहराच्या प्रत्येक भागात भक्तिभावाने उजळलेल्या या सोहळ्याने चंद्रपूरकर भारावून गेले.
गणेश भक्तांनी शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने व आकर्षक देखाव्यांसह आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषाने वातावरण उत्साहाने ओथंबून गेले.डोळ्यात अश्रू, मनात आनंद आणि पुढील वर्षी पुन्हा बाप्पाच्या स्वागताची आस, या भावनेने हजारो भक्तांनी गणरायाला निरोप दिला.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर व ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले. आ.मुनगंटीवार यांनी विविध गणेश मंडळांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, नागरिकांशी संवाद साधला आणि विसर्जन सोहळ्याच्या उत्कृष्ठ नियोजनासाठी मंडळांचे तसेच शिस्तबद्ध सहभागासाठी नागरिकांचे अभिनंदन केले.
या पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका, पोलिस प्रशासन, गणेश मंडळे आणि सर्व गणेश भक्तांचे कौतुक करताना सांगितले की, “श्रद्धा, शिस्त आणि उत्साह यांचा संगम म्हणजे चंद्रपूर शहरातील हा विसर्जन सोहळा. प्रशासन, नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला आहे.”